Friday, June 3, 2011

श्रीमहाराज ' नामावतार ' - १३









|| श्रीराम समर्थ ||
   || श्रीसद्गुरु  ब्रह्मचैतन्य महाराज समर्थ ||

          ' आपण अंतकाळी कसे जाणले जाता ? ' असा अर्जुनाचा प्रश्न होता. याचे उत्तर भगवंत देत आहेत. -
अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम |
                          य: प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशय: || गीता अ. ८-५ ||
          जो मनुष्य अंतकाळीही माझे स्मरण करीत शरीर सोडून जातो तो माझ्या साक्षात स्वरूपालाच प्राप्त होतो, यात काहीच शंका नाही.
          श्रीमहाराजांचा स्वभाव ईश्वररूप झालेला होता. ध्यानी, मनी, स्वप्नी रामरायाचे स्मरण होत होते. अंतकाली ' श्रीराम, श्रीराम ' असे स्मरण करत अत्यंत प्रसन्न चित्ताने श्रीमहाराजांनी प्राण सोडला.
          देहत्याग करताना जो भाव मनात असेल, त्या भावालाच मानव प्राप्त होतो, हे भगवंत आता सांगतात,
यं यं वापि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम |
               तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावित: || गीता अ. ८-६ ||
          हे कुंतीपुत्र अर्जुन ! मनुष्य अंतकाळी ज्या ज्या काही भावाचे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो, त्याच भावाला, सदा त्या भावाचेच चिंतन करीत असल्यामुळे प्राप्त होतो. 
          भगवंताच्या नामाची थोरवी गाता गाता श्रीमहाराजांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण गेला. नामाचे महत्त्व सांगण्यासाठी ते जन्माला आले; नामाचे महत्त्वाचे जन्मभर त्यांनी गायन केले; आणि आपल्या आयुष्याचे शेवटचे क्षण नामाचे महत्त्व सांगण्यातच त्यांनी घालविले. श्रीमहाराजांनी जन्मभर डोळ्यांनी नाम पाहिले , कानांनी नाम ऐकले, वाणीने नाम घेतले, मनाने नाम कल्पिले, बुद्धीने नाम चिंतिले. कायावाचामनाने जगात एका नामाशिवाय त्यांनी दुसरे काही सत्य मानलेच नाही. श्रीमहाराज अंतकाळीही श्रीरामभावनाभावित होत ब्रह्मभावात मिळून गेले.
महाप्रस्थान -  
          श्रीमहाराजांनी आपण इहलोक सोडून लवकरच प्रस्थान करणार याची कल्पना श्रीब्रह्मानंदांना पंढरपूर मुक्कामी त्यांचा निरोप घेतेवेळी दिली. दोघे एकांतात दीड तास बोलत होते. आपल्या माघारी गोंदवले संस्थानाच्या व्यवस्थेबद्दल बोलणे झाले असावे. गोंदवले संस्थानाच्या व्यवस्थेबद्दल त्यावर पंच नेमून पंचांना श्रीमहाराजांनी  सविस्तर सूचना केल्या होत्या.  तसेच मृत्युपत्रात आपल्या मालकीच्या स्थावर- जंगम मालमत्तेचीही योग्य ती व्यवस्था लिहून ठेवली. आपली सर्व शेती मंदिरांना वाटून टाकली. आपल्यामागे अन्नदान निरंतर चालावे हाही एक हेतू या व्यवस्थेमागे होता. 
           या सुमारास भेटावयास आलेल्या मंडळींना श्रीमहाराज आग्रहाने एकदोन दिवस जास्त ठेवून घेत; आणि त्यांना निरोप देताना सांगत की, ' मी आता लवकरच नैमिष्यारण्यात जाणार आहे. मी सांगितलेले नाम तेवढे  विसरू नका. त्यांतच कल्याण आहे ! ' कधी कधी श्रीमहाराज म्हणायचे, ' पहा बरं ! मी पक्ष्यासारखा केव्हा उडून जाईन त्याचा नेम नाही. नामाला लागा. ' स्वत:च्या अंतकालाबद्दल ते देत असलेल्या सूचना लोक फार गंभीरपणे घेत नसत.
           सन १९१३ साली मार्गशीर्ष पौर्णिमेचा दत्तजयंतीचा उत्सव ही श्रीमहाराजांची शेवटचीच दत्तजयंती ठरली. त्यादिवशी दम्याचा फार जोर होता. दत्तजन्म झाल्यानंतर दत्तमंदिराचे पुजारी बाळंभट यांना श्रीमहाराज म्हणाले, ' कुणास ठाऊक मी किती दिवस आहे ! रामाने बोलावले की मी जाणार ! ' 
          श्रीमहाराज थकत चालले होते. शक्ती क्षीण झाली होती. डॉ. गोपाळराव जोशी त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करीत होते. त्यांनी श्रीमहाराजांचे हृदय तपसले असता त्यांची अवस्था फारच वाईट असल्याचे आढळले तरीही चार- आठ दिवसात ते देह ठेवतील असे त्यांनाही वाटले नव्हते. पण याला कारणही तसेच होते. दोन दिवसच आधी, मस्ती करणाऱ्या बत्ताशा घोड्याला श्रीमहाराजांनी चांगला पाच- दहा मैल रपेट करून आणला तेव्हा कोठे तो शांत झाला. त्याला पाहून ते बोलले, ' मुक्या प्राण्याला देखील शेवटी सेवा घ्यावी अशी इच्छा झाली. राम कसा सगळीकडे भरलेला आहे. ' श्रीमहाराजांचा आहार कमी झाला होता. दमा फार जोर करू लागला होता. पायावर पुष्कळ सूज असून उभे राहण्यास त्यांना फार त्रास होई.
          याच सुमारास डॉ. कुर्तकोटी श्रीमहाराजांना भेटावयास आले होते. दोघांचे एकांतात तासभर बोलणे झाले.  ' माझा आता भरवसा नाही. म्हणून माझ्यामागे तुम्ही इथे राहून लोकांना नामस्मरण करायला लावावे. ' असे त्यांना सांगितले . दुसरे दिवशी निरोप घेताना ते नमस्कार करीत असता श्रीमहाराज इतकेच म्हणाले, 'नामाच्या आड सर्वच गोष्टी येतात; आपण स्वत:देखील त्याच्या आड येतो. तेवढे सांभाळावे, आणि जगाच्या नादी फारसे न लागता आपले काम चालू ठेवावे. राम तुमचे कल्याण करील.'
अखेरचे पाच दिवस-          
बुधवार, १७ डिसेंबर १९१३ - मार्गशीर्ष महिन्यात म्हसवडला नागोबाची यात्रा भरते व तेथे पुष्कळ गायी विकण्यास येतात. गायींना कसायाच्या हातून सोडविण्यासाठी पुरेसे पैसे बरोबर घेऊन श्रीमहाराज म्हसवडला निघाले. जाता जाता ते बोलले कि, ' ही आता अखेरची सेवा आहे ! ' त्यांनी पुष्कळ गायी कसायांच्या हातून सोडविल्या. याच यात्रेत श्रीमहाराजांना एक बैल पसंत पडला. त्याची किंमत विचारीत असता तेथील लोक म्हणाले, ' महाराज, हा बैल चांगला नाही. याची खोड वाईट आहे. हा ज्याच्या घरी जातो त्याची हानी करतो. ' हे ऐकून श्रीमहाराज हंसले व म्हणाले, ' तुम्ही सांगता हे खरे असेल, पण मी आहे गोसावी ! माझी हानी हा काय करणार ? मीच याला विकत घेतो; कारण हा गरीब लोकांची उगीच हानी करतो. हा माझ्या उपयोगी पडेल !' त्यांनी तो बैल विकत घेतला. नंतर त्यांचे शिष्य दिवाणसाहेब यांचे घरी विश्रांती घेऊन ते गोंदवल्यास निघाले. दिवाणसाहेबांनी नमस्कार केला तेव्हा ते म्हणाले, ' दिवाणसाहेब, तुमची आमची हीच अखेरची भेट आहे. नामाला विसरू नका. जेथे नाम तेथे मी आहे, हे ध्यानात वागवा ! ' 
 गुरुवार, १८ डिसेंबर १९१३ - गुरुवारी सकाळी श्रीमहाराज शौचमुखमार्जन झाल्यावर श्रीरामरायाच्या दर्शनास आले. दम्यामुळे रात्रभर उभे राहून काढल्याने त्यांच्या पायाची सूज वाढली होती. चालण्यास श्रम होत होते. श्रीमहाराज मंदिरात आसनस्थ होताच दहापंधरा मिनिटात स्त्रीपुरुषांनी सर्व मंदिर भरून गेले. गप्पा चालाव्यात अशा स्वरात श्रीमहाराज बोलले, ' बघा रे बुवा ! आमची जागा फार दिवस रिकामी पडली आहे, म्हणून आता रामाची चिट्ठी आली आहे. मला जाणे जरूर आहे. तुम्ही आनंदाने निरोप द्या. भगवंताच्या नामाला विसरू नका हेच माझे शेवटचे सांगणे आहे.'
          कितीतरी दिवसांपासून ते आपल्या जाण्याविषयी सर्वांना स्पष्ट सांगत होते, परंतु कोणाला ते खरे वाटलेच नाही. श्रीमहाराज स्वत:च्या जाण्याविषयी सांगताना इतके हंसत खेळत बोलत कि ऐकणाऱ्याला त्यांच्या शब्दांचे खरे महत्त्व वाटतच नसे. गुरुवारी सकाळी त्यांनी आपण लवकरच जाणार असे सर्व लोकांना अगदी स्पष्टपणे सांगितले.त्यानंतर दीड तास निरुपण झाले. श्रीमहाराज म्हणाले, ' जे दृश्य असते ते आज ना उद्या नाश पावते. दृश्य हे दृश्यपणात असताना स्वतंत्र नसते; ते भगवंताच्या अधीन असते. म्हणून जगात जी जी गोष्ट घडते ती ती भगवंताच्या इच्छेनेच घडते हे आपण ओळखावे. आपला देह हा दृश्य आहे. अर्थात त्याला चालवणारा भगवंत देहात आहे. त्याच्या अनुसंधानात राहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. हे अनुसंधान भगवंताच्या नामाने साधते; म्हणून तुम्ही सर्वांनी नाम घेण्याचा निश्चय करावा. आपले चित्त नामामध्ये गुंतले  म्हणजे देहाला प्रारब्धाच्या स्वाधीन करता येते. हि युक्ती ज्याला साधली त्याला सुखदु:खाची बाधा उरली नाही. व्यवहाराच्या मार्गाने जात असता भगवंताचे नाम कधी विसरू नये. आपल्या प्रयत्नाला जे फळ येईल ती भगवंताची इच्छा समजून जे पदरात पडेल त्यात समाधान मानावे. आपण प्रपंची लोक आहोत, म्हणून प्रपंचाला उचित असणारा प्रयत्न केल्यावाचून कधी राहू नये. पण प्रपंच हेच सर्वस्व आहे असे न समजता त्यामध्ये भगवंताला विसरू नये. परमार्थाला सदाचरणाची फार जरूर आहे. उगीच भलत्याच सांगण्याला भुलू नये आणि अनीती अधर्माच्या मार्गाला जाऊ नये. संत सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवून मुखात नाम ठेवावे, आणि सदाचरणाने वागून प्रपंच करावा. असे जो वागेल त्याचे कल्याण राम खात्रीने करील असे मी सर्वांना वचन देतो.'
          त्या दिवशी संध्याकाळी श्रीमहाराज धाकट्या राममंदिराकडे गेले. रामाचे दर्शन घेतल्यावर, जवळच राहणाऱ्या भाऊसाहेब केतकर यांच्या बिऱ्हाडी गेले. श्रीमहाराज आपल्याकडे एकटेच आलेले पाहून त्या उभयतांना फार आनंद झाला. बसता बसता श्रीमहाराज भाऊसाहेबांच्या मंडळींना म्हणाले, ' बाई मला फार भूक लागली आहे, काय असेल ते खायला द्या.' मुलांच्यासाठी भात टाकलेला होता. भात झाल्यावर सौ.बाईंनी तव्यावर थोडे पिठले टाकले आणि भाऊसाहेब व श्रीमहाराज असे दोघेजण जेवावयास बसले. जेवण चालू असता भाऊसाहेब सहज म्हणाले ' आपण थोडी विश्रांती घ्या म्हणजे जरा बरे वाटेल.' यावर श्रीमहाराज म्हणाले,   'भाऊसाहेब, या लोकांच्यासाठी खटपट करायला कोणी तयार होत नाही. हे सगळे हिंगजिऱ्याचे गिऱ्हाईक आहेत, केशरकस्तुरी मागणारा कोणी भेटत नाही. प्रत्येकाला प्रपंचासाठी देव पाहिजे; देवासाठी देव पाहिजे असे म्हणणारा हा खरा कस्तुरीचा चाहता. असा मनुष्य भेटणे कठीण जाते, म्हणून सामान्य माणसांनाच आपण तयार करीत राहिले पाहिजे. भाऊसाहेब, मला या कार्यामध्ये रामाने पुष्कळ यश दिले आहे. देह हा कष्टासाठीच असल्यामुळे त्याचे सुख वा दु:ख सारखेच मानावे !' जेवण झाल्यावर पाचदहा मिनिटे विश्रांती घेऊन श्रीमहाराज परत मोठ्या राममंदिराकडे गेले. 
शुक्रवार, १९ डिसेंबर १९१३ - शुक्रवारी श्रीमहाराज शाळेचे इन्स्पेक्टर काळे यांच्या निमंत्रणावरून त्यांच्या घरी दुपारी बारा वाजता जेवावयास गेले. श्रीमहाराजांच्या बरोबर फक्त भाऊसाहेब केतकर होते. दोघेजण पानावर बसले असता काही कामासाठी काळे आत गेले. जवळ इतर कोणी नाही असे पाहून श्रीमहाराज भाऊसाहेबांना म्हणाले, ' भाऊसाहेब, मला आता जाणे जरूर आहे. मी सोमवारी जाणार ! ' हे शब्द ऐकून भाऊसाहेबांना धक्काच बसला. जेवण आटोपून श्रीमहाराज मंदिरात परत आले. संध्याकाळी दम्याचा त्रास वाढला. त्याचवेळी समर्थांचा प्रसाद म्हणून एका कऱ्हाडच्या माणसाने श्रीमहाराजांना नवीन कफनी दिली. त्याच्या आग्रहाखातर श्रीमहाराजांनी ती कफनी घातली आणि रामासमोर आले, व लगेच भजनाला उभे राहिले. पायावर फार सूज असल्यामुळे त्यांना फार वेळ उभे राहवत नव्हते, म्हणून कोणाच्या तरी खांद्यावर हात ठेवून उभे राहात आणि निरुपण सांगत. त्या दिवशी रात्री एक वाजेपर्यंत भजन व निरुपण झाले.
शनिवार, २० डिसेंबर १९१३ - श्रीमहाराजांचे चुलते संन्यासी होते. त्यांचे वृंदावन धाकट्या राममंदिरापाशी आहे. शनिवारी त्यांची पुण्यतिथी होती म्हणून श्रीमहाराज वृन्दावनाकडे आले होते. त्याच रात्री नेहमीप्रमाणे श्रीमहाराज भजनास उभे राहिले. मंदिरात खूप गर्दी झाली. सुरुवातीला ते मागे पुढे फिरत होते, पण नंतर कोणाच्या तरी खांद्यावर हात ठेवून उभे राहिले. पायांना रग लागली म्हणजे एक पाय उचलून धरावा  व एकाच पायावर उभे रहावे, त्या पायाला कळ लागली म्हणजे तो उचलून दुसऱ्या पायावर उभे रहावे, याप्रमाणे त्यांनी रात्री दीड वाजेपर्यंत भजन केले. निरुपणामध्ये देहाचे अशाश्वतपण, भगवंताची निष्ठा, नामाचे महत्त्व, सगुणाचे प्रेम, संतांच्या संगतीचे श्रेष्ठपण, याबद्दल पुन्हा पुन्हा त्यांनी सांगितले.
रविवार, २१ डिसेंबर १९१३ - रविवार उजाडताच श्रीमहाराजांच्या सकट सर्व लोकांचे नित्याचे व्यवहार सुरु झाले. 
          संध्याकाळी पाच वाजता श्रीमहाराज गोठ्यावर गेले. बापूसाहेब खरे यांची सून न्यूमोनियाने आजारी होती, तिला तेथेच ठेवली होती. डॉ. जोशी तिची शुश्रुषा करीत होते. श्रीमहाराज तिच्याजवळ गेले व ' बरे वाटेल, काळजी करू नकोस. ' असा तिला धीर देत आपण गोठ्यात गेले. गोठ्यामध्ये गायी, वासरे मिळून पाऊणशे जनावरे होती. सर्वांना नीट पाहून तेथे गवत पडले होते ते साफ करण्यास भवानरावास सांगितले. ती जागा स्वच्छ करून घेऊन तेथे ठेवलेल्या खुर्चीवर बसले. गवताच्या गंजी घेतल्या होत्या त्याची विशेष काळजी घेण्यास भवानरावाला सांगून श्रीमहाराज सहजपणे बोलले, ' ही जागा फार छान आहे. इथे कायमचे रहावे असे मला फार वाटते.' श्रीमहाराजांना गायींचे विलक्षण प्रेम होते. कधी कधी गायींचा गोठा ते स्वत: साफ करीत. कधी कधी तेथेच स्वयंपाक करवून जेवण करीत.
          अंधार पडण्याच्या सुमारास गार वारा सुटला म्हणून श्रीमहाराज मंदिरात आले. रात्रीचा फराळ झाल्यावर श्रीमहाराज थोडी विश्रांती घेऊन भजनाला उभे राहिले. नऊ वाजताच सर्व मंदिर गच्च भरून गेले. त्यांच्या आयुष्यातला तो शेवटचा दिवस होता. त्यांचे ते शेवटचे भजन व निरुपण होते. श्रीमहाराज सुरुवातीला मागे पुढे हलत होते, पण दहा वाजल्यानंतर एके ठिकाणी उभे राहूनच  ते भजनात रंगून गेले होते. उभे राहण्याचे कष्ट सहन करीतच भजन चालू होते. सर्व निर्वाणीचे अभंग त्यांनी सांगितले. एक अभंग असा सांगितला -
शरण शरण रघुनाथा | भक्तपालन करी आतां || १ ||
श्रीरामा निरोप द्यावा | देई अखंडित सेवा || २ ||
ब्रीद राखी रघुराज | हेची सांगतसे आज || ३ ||
दिनदासाची विनवणी | आज्ञा द्यावी चक्रपाणी || ४ ||
          त्यानंतर नाममहात्म्य सांगणारा अभंग त्यांनी म्हटला. श्रीमहाराजांनी जन्मभर भगवंताच्या नामाचा अट्टाहास धरला. शेवटच्या दिवशीही भगवंताचे नामच त्यांनी लोकांना सांगितले. त्या दिवशीच्या भजनात आणि निरुपणात एक विशेष भावपूर्ण रस ओसंडत होता की ऐकणाऱ्या सर्वांच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या होत्या. भजन होता होता रात्रीचा एक वाजला. श्रीमहाराजांनी अभंग म्हटला -
सरली आयुष्याची गणना | आता येणे नाही पुन्हा ||१ ||
तुझ्या पायी मन राही | हेचि सुख आम्हा देई || २ ||
तुझ्या पायी पडली मिठी | आता जातो उठाउठी || ३ ||
दीनदास म्हणे रघुनाथा | आज्ञा द्यावी मज आता || ४ ||
श्रीरामरायाकडे पहात, हा अभंग म्हणताना श्रीमहाराजांच्या वाणीतून सगुण प्रेमाचा अमृतरस पाझरत होता. लगेच लोकांच्याकडे पाहून ते म्हणाले - 
बाळ गोपाळ लहान थोर | भाऊबंद वतनदार || १ ||
नाही झालो द्रव्यवान | जन्म घेऊनि झाला शीण || २ ||
काय दाखवू वदन | रामार्पण केला प्राण || ३ ||
आता नाही नाही धोका | राम नेईल परलोका || ४ ||
आज्ञा सकळ लोक | पाया पडतो मी रंक || ५ ||
आता पुन्हा नये गावा | दिनदासा कृपा ठेवा || ६ ||
आपण जाणार हे श्रीमहाराजांनी लोकांना जवळ जवळ स्पष्टच सांगितले. श्रीमहाराजांच्या तोंडून हा अभंग ऐकल्यावर लोकांचा जीव नुसता पिळवटून निघाला. त्यांना मोठ्याने रडता येईना व दु:ख आतमध्ये सामावेना, पण तेथून उठून बाहेरही जाववेना. अखेर दीड वाजला तेव्हा श्रीमहाराजांनी सर्वांना नमस्कार केला, सर्वांच्याकडे प्रेमाने भरलेल्या नजरेने बघितले, आणि अगदी सावकाश पण गोड आवाजात अखेरचा अभंग म्हटला -
भजनाचा शेवट आला | एकवेळ राम बोला || १ ||
आजि पुण्य पर्वकाळ | पुन: नाही ऐसी वेळ || २ ||
रामनाम वाचे बोला | आत्मसुखामाजी डोला || ३ ||
दीनदास सांगे निका | रामनाम स्वामी शिक्का || ४ ||
झाले ! श्रीमहाराजांचे शेवटचे भजन संपले.   
सोमवार, २२ डिसेंबर १९१३ - श्रीमहाराजांनी २२ डिसेंबर चा सूर्योदय पहिला नाही. निर्वाणीचे अभंग झाले, नाम महात्म्य सांगणारे निरुपण संपले, रविवारची मध्यरात्र उलटून रात्रीचा दीड  वाजला होता. रामाची आरती झाल्यावर श्रीमहाराज आसनस्थ झाले. ते जरा थकलेले दिसत होते. परगावहून आलेल्या दर्शनार्थींशी प्रसन्नतेने बोलत होते. रात्रीचे दोन वाजले. सर्वांना निजावयास जाण्यास  सांगून आपण स्वत: आपल्या खोलीमध्ये आले. काही मोजकी मंडळी त्यांच्या बरोबर होती. दहा मिनिटे तक्क्याला टेकून बसले व नंतर म्हणाले, ' मी जरा आडवा होतो.' असे म्हणून ते अंथरुणावर लवंडले. ते उताणेच निजले होते.त्यांचा चेहरा फारच शांत व प्रसन्न दिसत होता. महाप्रस्थानाची वेळ जवळ येत होती. चार वाजण्याच्या सुमारास ते एकदम डाव्या कुशीवर वळले आणि ' श्रीराम, श्रीराम ' असा मधुर प्रेममय शब्द त्यांच्या मुखातून बाहेर पडला. पाच मिनिटांनी त्यांनी डोळे उघडले व ते उठून बसले. 
          खोलीमध्ये जागत बसलेल्या हरिपंत मास्तर, वामनराव ज्ञानेश्वरी, अम्मा अशा सर्वांवर प्रेमाची, कृपेची नजर फिरवून श्रीमहाराजांनी डोळे झांकले. डोळे मिटलेले सिद्धासनातील श्रीमहाराज एखाद्या योग्यासारखे दिसत होते. सव्वापाच वाजता त्यांची समाधी उतरली व त्यांनी डोळे उघडले. शौचमुखमार्जन उरकून घेण्यासाठी सर्वांना सांगितले व वामनरावांच्या बरोबर स्वत: बाहेर गेले. पंधरा मिनिटांनी ते परत आले. श्रीमहाराजांनी अंगात कफनी, डोक्याला उपरणे, आणि पायात वहाणा घातल्या होत्या. हातपाय धुवून ते रामासमोर आले, त्यांनी साष्टांग नमस्कार घातला व म्हणाले, ' माझ्या माणसांना सांभाळ. ' शेजारीच अम्मा उभी होती. खोलीत जाता जाता तिला ते म्हणाले, ' अम्मा ! रामरायाची ही अखेरची सेवा बरे का ! ' खोलीत आल्यावर पुन्हा ते पलंगावर आसन घालून बसले. इतक्यात वामनरावांनी त्यांच्या पायावर डोके ठेवले. आपला उजवा हात वामनरावांच्या डोक्यावर ठेवून अत्यंत प्रेमाने त्यांच्याकडे पहात श्रीमहाराज म्हणाले,
' जेथे नाम तेथे माझे प्राण | ही सांभाळावी खूण ||
          इतरांनीही त्यांच्या पायावर डोके ठेवले. त्यांनी प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवला, प्रत्येकाकडे प्रेमाने पाहिले आणि श्रीमहाराजांनी डोळे झांकून घेतले. त्यावेळी ' अमृत ' नावाची उत्तम घटका सुरु होती. त्यांचा श्वास जरा जोराने बाहेर पडू लागला, म्हणून जेरे मास्तरांनी भाऊसाहेब केतकर यांना बोलावणे धाडले. डॉ.जोशी  यांच्याकडेही सांगावा गेला. पण ते दोघे येण्याच्या अगोदरच श्रीमहाराजांनी आपली प्राणज्योत अनंतात विलीन केली. श्रीमहाराजांनी महाप्रस्थान केले होते. अशा रीतीने, सहाला दहा मिनिटे कमी असताना, जगाला प्रकाश देणारा भौतिक सूर्य पूर्वेकडून वर येऊ पहात असताना, गोंदवल्याचा हा अध्यात्मसूर्य मावळला, आणि तो कायमचाच मावळला. राम-कृष्ण अवतार परंपरेतील ' नामावतार ' आपले अवतार कार्य संपवून महाप्रस्थान करता झाला.एका अतिदिव्य जीवन चरित्रातील शेवटचा अंक समाप्त झाला. गुरुशोधार्थ, नैमिष्यारण्यात जाण्यासाठी, काशीयात्रेला जाण्यासाठी, राममंदिराच्या स्थापनेसाठी, श्रीमहाराजांना यापूर्वी गोंदवल्याहून प्रस्थान करावे लागले पण पुन्हा माघारी गोंदवल्यास येणे झाले. मात्र आता श्रीमहाराज जेथून आले तेथे जाण्यासाठी महाप्रस्थान करते झाले !  
          देहातून प्राण बाहेर पडल्यावर वामनरावांनी श्रीमहाराजांना कुशीत धरले होते. इतक्यात भाऊसाहेब तेथे आले. तो प्रसंग पाहून त्यांच्या काळजात चर्र झाले. डॉ.जोशी आले. त्यांनी कानाला नळी लावून छाती बघितली, नाडी बघितली, आणि तोंडाने शब्द न बोलता नुसत्या हातांनी ' सगळे संपले ' म्हणून सांगितले. श्रीमहाराज आता पुन्हा जागे होणार नाहीत हे समजल्यावर सर्व मंडळींमध्ये दु:खाचा डोंब उसळला ! वाऱ्याच्या वेगाने ही वार्ता सगळीकडे पसरली. लहान मुले, बायका, पुरुष, सर्वजण त्या निष्प्राण देहावर पडून ओक्साबोक्शी रडू लागले. श्रीआईसाहेबांना शोक अनावर झाला. आपला त्राता गेला, आपला आधार तुटला, आपला कैवारी नाहीसा झाला, आपला मायबाप हरपला, असे सर्वांना दिसून सगळीकडे ओके ओके, भकास वाटू लागले. भक्त मंडळीना एवढा आघात झाला की, त्यांची मती गुंग होऊन गेली. 
          श्रीमहाराजांचा चेहरा अत्यंत शांत व मुद्रा प्रसन्न असून त्यांच्या वदनमंडलावर मोठे तेज चढले होते. मृत्यूची कोणतीही चिन्हे त्यांच्या शरीरावर दिसत नसून ते स्वस्थ निजले आहेत असे पाहाणाऱ्याला वाटे. सर्वदूर निरोप गेले, तारा पाठविण्यात आल्या. सकाळी दहा वाजल्यापासून त्या महापुरुषाचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी लोकांच्या झुंडीच्या झुंडी येऊ लागल्या. 
           अप्पासाहेब भडगावकर तार  मिळताच पंढरपूरहून त्याच रात्री गोंदवल्यास पोचले. श्रीब्रह्मानंदांची वाट बघावी असे सर्वानुमते ठरल्याने श्रीमहाराजांचे शरीर कडूलिंबाचा पाला घालून झांकून ठेवले. इकडे श्रीब्रह्मानंदांना हि बातमी कळताच ते मटकन खालीच बसले आणि एखाद्या लहान मुलासारखे मोठ्याने रडू लागले. शोक अनावर झाला. बेलधडीला जाण्यास निघालेले ते पुढे तीन दिवस कोठे तरी गुप्त झाले होते.
          चहुकडून माणसे अंत्यदर्शनासाठी गोंदवलेस येत होती. सोमवारचा दिवस तर गेलाच, मंगळवारचा दिवस उजाडला तरी श्रीब्रह्मानंदांच्या येण्याचा संभव दिसेना. मग मात्र भाऊसाहेब केतकर यांनी पुढाकार घेऊन त्याच दिवशी अंत्यसंस्कार करण्याचे ठरविले. रविवारी  संध्याकाळी श्रीमहाराज गोठ्यावर ज्या जागेवर बसले होते ती जागा दहनभूमी म्हणून ठरवली. मोठे शोभिवंत विमान करून त्यामध्ये त्यांना बसविले. कपाळाला बुक्का लावला. गळ्यात तुळशीचा मोठा हर घातला. त्यांची पूजा व आरती केली, आणि ' जानकी जीवन स्मरण जय जय राम ' म्हणून सर्वांनी विमान उचलले. ' जय जय श्रीराम, जय जय श्रीराम ' असे भजन करीत, गुलाल बुक्का आणि फुले उधळीत सर्वजण निघाले. गावातून मिरवीत विमान दहनभूमीवर आणले. जागा गोमयाने सारवून, रांगोळ्या घालून आणि केळीचे खुंट बांधून शृंगारली होती. तेथे आल्यानंतर थोडे भजन झाले. श्रीमहाराजांचा चुलत भाऊ श्रीहरी याने सर्व संस्कार यथासांग केले आणि शरीर चितेवर ठेवले. अग्निनारायणाने श्रीमहाराजांच्या शरीराला कवटाळले. दुपारी तीन वाजण्याची वेळ होती, आणि अग्नीच्या ज्वाळा भयंकर रूप घेऊन आकाशाकडे झेप घेत होत्या. साश्रू नयनांनी ' श्रीराम, श्रीराम ' असे म्हणत मोठ्या जड अंत:कारणाने लोकांनी निरोप दिला.
          तिसऱ्या दिवशी अस्थी गोळा करून भरून ठेवण्यात आल्या. प्रयागला नेण्यासाठी हरिपंत मास्तर अस्थी  घेऊन निघाले. त्यांचा वाटेत हर्दा येथे मुक्काम झाला. श्रीआनंदसागरांच्या अस्थी हर्दा येथे श्रीमहाराज प्रयागला जातील तेव्हा विसर्जित करतील म्हणून कपाटात ठेवल्या होत्या. पण तसे घडले नाही. त्याही अस्थी  हरीपंतानी बरोबर घेतल्या. भय्यासाहेब इंदुरकर, कुंभोजकर, पटाईत मावशी, इंदूरची ती, मसुरीयादिन शिवमंगल, बाबूभट आदी सर्व मंडळी हरीपन्तांच्या बरोबर प्रयागला गेली व नामाच्या गजरात गुरु- शिष्याच्या अस्थी  गंगेत विसर्जित झाल्या. ज्या देहाने असंख्य लोकांना भगवंताच्या नामाचा व प्रेमाचा महिमा पटवून दिला त्या देहाचे भौतिक अवशेष जरी नाहीसे झाले तरी तो नामरूपी ' चैतन्यस्पर्श ' आसमंतात भरून राहिलेला आहे !
जयाचा जनी जन्म नामार्थ झाला |
ज्याने सदा वास नामात केला |
जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती |
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती  ||

|| जय जय रघुवीर समर्थ ||    

                   



Tuesday, May 17, 2011

श्रीमहाराज ' नामावतार ' - १२

 -



|| श्रीराम समर्थ ||
   || श्रीसद्गुरु  ब्रह्मचैतन्य महाराज समर्थ ||


          भगवंत या श्लोकात आपली अर्थात सगुण-साकाराची सुगमतेने होणारी प्राप्ती सांगतात. -
अनन्यचेता: सततं यो मां स्मरति नित्यश: |
                         तस्याहं सुलभ:पार्थ नित्ययुक्तस्य योगीन: || गीता अ. ८-१४ ||
          हे पृथानंदन ! अनन्यचित्ताचा जो मनुष्य माझे नित्य-निरंतर स्मरण करतो त्या नित्य-निरंतर माझ्यात लागलेल्या योग्यासाठी मी सुलभ आहे अर्थात त्याला सुलभतेने प्राप्त होतो. 
          ईश्वरप्रणिधान करणाऱ्या योग्याची सतत ( निरंतर ), नित्यश: (यावज्जीवन ) अनन्यचित्त (अव्यभिचारी भाव ) आणि नित्ययुक्त ( सततानुसंधान ) अशी चार वैशिष्ट्ये भगवंतांनी या श्लोकात सांगितली आहेत. 
          श्रीमहाराजांनी अनन्यचित्ताने श्रीरामरायाचे नित्य- निरंतर नामस्मरण केले. रामनामासाठी उभे आयुष्य वेचले. सदैव रामरायाच्या सततानुसंधानात राहत इतरांनाही नाममार्गाचे महात्म्य सांगत सन्मार्गाला लावले.
          श्रीमहाराजांच्या  आयुष्यातील अखेर - अखेरच्या दिवसातील धावपळीचा वेध आपण घेत आहोत. 
अखेर - अखेरचे दिवस -     
          वयाच्या ६५व्या वर्षी सन १९०९ साली औंध संस्थानात नेमलेल्या सरकारी प्रशासक जेकबने  श्रीमहाराजांना विष घालण्याचे नीच कारस्थान रचले. जेकबच्या हस्तकाने श्रीमहाराजांना जेवणाचे आमंत्रण दिले. त्यानुसार श्रीमहाराज जेवायला गेले. त्या माणसाने त्यांना अन्नामध्ये सोमल मिसळून खायला घातला. रामकृपेने श्रीमहाराजांचे प्राण वाचले पण या प्रसंगानंतर त्यांना दम्याचा विकार जडला आणि तो शेवटपर्यंत राहिला. सन १९१० साली श्रीमहाराजांना प्लेग झाला.
          विषप्रयोग, त्यातून उद्भवलेला दमा, आणि प्लेगच्या साथीत प्लेग अशा अंगावरच्या आघातांमुळे श्रीमहाराज खूपच अशक्त, विकल झाले पण त्यांचे नित्याचे व्यवहार थांबले नाहीत. त्यांचे कार्यक्रम व्यवस्थित चालू होते. अविरतपणे त्यांचा प्रवासही चालू होता. सन १९१० साली सर भालचंद्र भाटवडेकर यांच्या निमंत्रणावरून श्रीमहाराज काही मंडळींना बरोबर घेऊन मुंबईला गेले. मुंबईहून परत आल्यावर त्याच साली पुष्कळ मंडळी बरोबर घेऊन ते हुबळीला सावकार चिदंबर नाईक यांनी बांधलेल्या मंदिरात रामाच्या स्थापनेसाठी गेले. 
          सन १९११ साली श्रीमहाराज कराडला रामस्थापनेसाठी गेले. श्रीमहाराजांनी रामस्थापना केलेली बरीचशी राममंदिरे याच सुमारासाची आहेत. श्रीब्रह्मानंदांच्या निमंत्रणावरून श्रीमहाराजांनी बिदरहळळी येथे रामाची स्थापना केली. तेरा कोटी रामनाम जपाची सांगताही श्रीमहाराजांच्या उपस्थितीत बिदरहळळी येथे झाली. कुर्तकोटी येथे डॉ. कुर्तकोटींनी केलेल्या तेरा कोटी रामनाम जपाची सांगता श्रीमहाराजांच्या उपस्थितीत झाली. कुर्तकोटीहून श्रीमहाराज रामस्थापनेसाठी सोलापूरला गेले. सोलापूरहून कुर्डूवाडी. पंढरपूर. पुणे असे मुक्काम करत श्रीमहाराज १९१२ सालच्या नोव्हेंबरमध्ये गोंदवल्यास परत आले. शरीर थकत चालले होते. जीर्ण होत होते. बाहेरून पाहिले असता त्यांचे सर्व कार्यक्रम पूर्ववत व्यवस्थित चाललेले आहेत असे वाटे, परंतु त्यांची प्रकृती  बरीच क्षीण होत चालली होती. कधीमधी दिसणारी त्यांच्या पायावरील सूज आता नेहमी दिसू लागली, आणि दम्याचे प्रमाण देखील पहिल्यापेक्षा अधिक झाले. ज्योतिषाच्या सांगण्यावरून श्रीमहाराजांनी धर्मशाळेपाशी शनीचे मंदिर बांधले. ' हा देवाचा फौजदार आहे ' असे शनीचे वर्णन ते करीत.
          सर्व मंदिराचे एक संस्थान बनवून त्यावर पंच नेमले. त्यांना सर्व व्यवस्था आखून दिली.  'आल्यागेल्याला भाकरी घालावी, आणि आपण सर्वांनी नाम घ्यावे, ' हे मुख्यत: सांगून ठेवले.  
रामनवमीचा उत्सव - सन १९१३ साली साजरी झालेली रामनवमी हि श्रीमहाराजांनी साजरी केलेली शेवटची रामनवमी होय.त्यांनी आपल्या सर्व मंडळींना पत्रे धाडून रामनवमीला येण्याविषयी लिहिले.पत्रात ते लिहितात 'मी कदाचित नैमिष्यारण्यात जाईन, म्हणून तुम्हाला एकदा पहावे असे वाटते. '
          श्रीमहाराजांचे असे पत्र आल्यामुळे प्रत्येकजण गोंदवल्याला आला. हा रामनवमीचा उत्सव दहा दिवस चालला. पांच हजारावर माणसे चोहोकडून जमा झाली. नऊ दिवस अहोरात्र अखंड नामस्मरण चालू होते, शिवाय कीर्तन, पुराण, प्रवचन, अध्यात्मसंवाद इत्यादी गोष्टी सुरु होत्या. जमलेल्या सर्वांचे केंद्र अर्थातच श्रीमहाराज होते. प्रत्येक मनुष्य त्यांना नमस्कार करण्यास येई; त्यावेळी मोठ्या प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरवून श्रीमहाराज त्याला सांगत, ' बाळ, भगवंताने ज्या परिस्थितीत प्रपंचामध्ये आपल्याला ठेवले आहे, तिच्यात समाधान मानावे; पण त्याच्या नामाला कधीही  विसरू नये. जो नाम घेईल त्याच्यामागे राम उभा आहे. नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो येवढे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका ! ' पारण्याला श्रीमहाराजांनी गावजेवण घातले. जवळजवळ दहा हजार पान झाले, आणि सर्व लोकांना, श्रीमहाराजांनी स्वत: देखरेख ठेवून अगदी पोटभर खावयास घातले.
          दशमीला लोकांनी श्रीमहाराजांना अहेर केला. कोणी कफनी दिली, कोणी कुबडी दिली, कोणी माळ दिली, कोणी खडावा दिल्या, कोणी अत्तर दिले; कोणी लोकरीचे कपडे दिले, तर कोणी उपरणे दिले, अशा वस्तूंचा ढीग पडला.
          उत्सवाला आलेली मंडळी द्वादशीपासून हळूहळू परत जाण्यास निघाली. परत जाणाऱ्या प्रत्येकाला श्रीमहाराजांनी काही ना काही दिले. काही लोकांना कफन्या व खडावा दिल्या व सांगितले, ' माझी आठवण म्हणून हे ठेवा. ' परंतु ' नाम घ्यायला विसरू नकोस.' हे प्रत्येकाला आग्रहाने सांगण्यासही ते विसरले नाहीत.  
          आताशा, श्रीमहाराजांचे बोलणे चालणे फार सूचक झाले होते. परंतु त्यांची ती मुद्रा, विनोद करण्याचा स्वभाव, देहाला वाटेल त्याप्रमाणे राबविण्याची शक्ती, या गोष्टींमुळे स्वत:च्या अंतकालाबद्दल त्यांनी दिलेल्या आगाऊ सूचनांचा लोकांच्या मनावर फारसा परिणाम झाला नाही हि गोष्ट खरी आहे. दिवसेंदिवस ते झपाट्याने थकत चालले होते. गोंदवल्यास सेवेसाठी येणाऱ्या सगळ्यांच सगळ, अगदी दुखण खुपणही श्रीमहाराज बघत होते. एक दिवस ते भाऊसाहेब केतकरांना म्हणाले, ' भगवंताची सेवा एकपरी सोपी आहे. पण गुरूची सेवा करणे फार कठीण आहे. नाथांनी खरी गुरूची सेवा केली. कल्याणांनी खरी गुरुसेवा केली. स्पष्ट सांगावयाचे म्हणजे खरा शिष्य मिळणे ही कठीण गोष्ट आहे. देहबुद्धी नाहीशी झाल्याशिवाय पूर्ण गुरुसेवा घडत नाही, आणि गुरुसेवेत देह झीजल्यावाचून देहबुद्धी पूर्ण नष्ट होत नाही. '
पंढरपूरचा मुक्काम -  पंढरपूरच्या बडव्यांच्या निमंत्रणावरून श्रीमहाराज सन १९१३ च्या जून महिन्यात सुमारे शंभर मंडळींसह पंढरपूरला आले. तेथे गेल्यानंतर काही दिवसांनी गुरुपौर्णिमा आली आणि त्या निमित्ताने पुन्हा बहुतेक सर्व मंडळी दर्शनाला आली. श्रीब्रह्मानंद देखील कर्नाटकातील बरीच मंडळी घेऊन पंढरपूरला आले. ज्याप्रमाणे रामनवमीचा उत्सव गोंदवल्यास फारच लक्षात राहण्यासारखा झाला, त्याचप्रमाणे ही शेवटची गुरुपौर्णिमाही फारच थाटात आणि प्रेमाची झाली.कधी स्वस्थ न बसणारे श्रीमहाराज त्या दिवशी पूजा चालू असता दोन तीन तास अगदी स्वस्थ बसून होते. सर्वांची पूजा आटोपल्यावर सगळ्यांना ( जवळजवळ सातआठशे स्त्रीपुरुष मंडळींना ) खाली बसण्यास सांगून ते म्हणाले, ' बाळांनो ! ज्याच्यावर कोणाची सत्ता चालत नाही, आणि जो कधी कोणापासून लाच घेत नाही, जो गेलेला कधी परत येत नाही, जो जात असताना कोणाला कळत नाही, जो किती गेला आणि उरला हे कोणाला सांगता येत नाही, आणि जो भगवंताशिवाय कोणाला भीत नाही, असा काळ आजपर्यंत कोणाला चुकला नाही. ज्या काळाच्या सत्तेने वस्तू आकार धारण करते त्याच काळाच्या सत्तेने ती अकस्मात मोडली जाते. सर्व दृश्य वस्तूंना हा नियम लागू आहे; मग देह त्यातून कसा सुटेल ? ज्याने भगवंत घट्ट धरून ठेवला,त्याचा देह राहिला किंवा गेला, तरी त्याच्या अवस्थेमध्ये फरक पडत नाही. भगवंत आकाराने नाहीसा झाला, परंतु नामरूपाने जगात शिल्लक उरला म्हणून यापुढे कोणी सांगणारा भेटो, वा न भेटो, तुम्ही सर्वांनी नाम घेतल्याशिवाय राहू नये. जो भगवंताचे नाम घेईल त्याचे कल्याण  राम करील, हे माझे सांगणे खरे माना. प्रपंच लक्ष देऊन करा, त्यामध्ये भगवंताला विसरू नका, हाच माझा अट्टाहास. सर्वांनी आनंदात दिवस घालवावा. ' हे बोलत असताना श्रीमहाराजांना मधून मधून भरून येत होते. ऐकणाऱ्या मंडळींच्या डोळ्यांना अश्रूधारा लागल्या होत्या. 
          पंढरपूरच्या मुक्कामात श्रीमहाराजांचे स्नेही तुकारामबुवा वलव्हणकर यांची भेट झाली. वलव्हणकर हे मठपती  होते. ते पंढरपुरास नेहमी येत असत. ते वेदांतशास्त्रात निष्णात असून त्यांची उपासना कडक होती. पुष्कळ लोक त्यांना गुरु मानीत असत. वेदान्तशास्त्र चांगले जाणत असल्याने त्यांचे कीर्तन किंवा प्रवचन फारच वठत असे. ज्ञानेश्वरीवर त्यांचे प्रभुत्व होते. भगवंताच्या नामापेक्षा भगवंताचे रूप श्रेष्ठ आहे असे मोठ्या  अट्टाहासाने ते प्रतिपादन करीत. याच विषयाला अनुसरून श्रीमहाराजांच्या बरोबर झालेल्या वाद-संवादात त्यांनी वलव्हणकरांना रूपापेक्षा नाम श्रेष्ठ आहे हे नुसते पटवून दिले नाही तर नामाचे महात्म्य त्यांच्या मनी ठसविले. निरोप घेण्यापूर्वी ते श्रीमहाराजांच्या पाया पडले. 
          पंढरपूरला श्रीमहाराज जवळपास चार महिने होते. श्रीब्रह्मानंदही त्या काळात त्यांच्याबरोबरच होते. श्रीमहाराजांचा निरोप घेतेवेळी त्या दोघांचे एकांतात बोलणे झाले. स्वत:च्या आयुष्यात आपण काय काय गोष्टी  केल्या हे श्रीब्रह्मानंदांना सांगून, आपण यापुढे लवकरच शांत होणार असे त्यांना सुचविले. श्रीब्रह्मानंद मान  खाली घालून व हात जोडून मुकाट्याने सर्व ऐकून घेत होते; पण आपण थोड्या दिवसांनी इहलोक सोडणार हे श्रीमहाराजांनी सांगितल्यावर त्यांच्या काळजात चर्र झाले, आणि त्यांच्या सारख्या वैराग्यशील पुरुषाच्या डोळ्यांना टचकन पाणी आले. श्रीमहाराजांचे बोलणे संपल्यावर श्रीब्रह्मानंदांनी त्यांच्या पायावर मस्तक ठेवले. त्यावेळी ' या बर बाळ ! ' असे फार प्रेमाने बोलून श्रीमहाराजांनी त्यांच्या पाठीवरून हात फिरविला. श्रीब्रह्मानंदांनी त्यांना एकदा डोळे भरून पाहून घेतले आणि लगेच तोंड फिरवून गाडीत जाऊन बसले. 
            श्रीब्रह्मानंदांनी पंढरपूर सोडल्यावर मात्र श्रीमहाराजांनी बरोबर असलेल्या पुष्कळशा मंडळींना हळूहळू घरी पाठवून देण्यास आरंभ केला. दोनशे मंडळींपैकी फक्त पन्नाससाठ माणसे राहू दिली; आणि मग आपण स्वत: सप्टेंबर महिना अर्धा संपल्यावर गोंदवल्यास परत आले. 
          गोंदवल्यास जेमतेम ८-१० दिवस राहून श्रीमहाराज कुरवलीच्या दामोदरबुवांच्या बरोबर त्यांनी कुरवलीस बांधलेले राममंदिर पहावयास गेले. श्रीमहाराजांचे जंगी स्वागत झाले. दर्शनास मोठा समुदाय लोटला. बरोबरच्या उरलेल्या बऱ्याच मंडळींना आपापल्या घरी पाठवून दिले आणि फक्त मोजकी चार-पाच माणसे बरोबर घेऊन ते गोंदवल्यास परत आले. श्रीमहाराज निरवा निरव करीत असावेत हे बरोबरच्या लोकांना जाणवत होते. अगदी निकट सहवासात असणारी तेव्हढीच मंडळी तेथे उरली.
          अलीकडे श्रीमहाराजांच्या बोलण्यात, ' आपण लवकरच जाणार ' अशी भाषा येत असे. तसेच ' येणारा काळ कठीण व वाईट आहे, सांभाळा रे सांभाळा, कली फार मातेल, महागाई फार वाढेल, स्वार्थ फार बोकाळेल, अनीतीला जोर चढेल, भगवंताचा विसर पडेल, आणि रोगराई खूप पसरेल.' असेही ते सारखे लोकांना सांगत. यावर एकदा अम्माने प्रश्न विचारला, ' महाराज, हा पुढे येणारा काळ जर वाईट आहे तर आपण लवकर जाण्याची भाषा का बोलता ? ' हा प्रश्न ऐकून श्रीमहाराज किंचित हसले व बोलले, ' माय, तुम्ही विचारलेला प्रश्न मार्मिक आहे. कितीही मोठा सत्पुरुष तरी त्याने देह धारण केला म्हणजे त्याला थोडे तरी जडाच्या मर्यादेने  वागावे लागतेच. प्रत्यक्ष परमात्मा असून देखील श्रीकृष्णाला देह धरल्यानंतर दुर्योधनाची बुद्धी पालटता आली नाही. पण देह सोडल्यावर सत्पुरुषांचे सूक्ष्माच्या साम्राज्यातच वास्तव्य असल्याने जगाची बुद्धी पालटण्यात त्यांना जास्त यश येऊ शकते; आणि ज्यावेळी ज्या गोष्टीची जरूर असते तीच गोष्ट ते करीत असतात. आता समजले ना ! ' अम्मा ' होय ' म्हणाली आणि तो विषय तेथेच थांबला. 
          बापूसाहेब साठ्ये यांच्याबरोबर फडके नावाचे एक सब जज्ज श्रीमहाराजांच्या दर्शनास आले. श्रीम्हाराजांबरोबर त्यांचा झालेला संवाद आणि श्रीमहाराजांनी व्यक्त केलेले विचार उद्बोधक आहेत. फडके विचारतात, ' सुधारलेल्या लोकांची संस्कृती आणि सुधारणा आपल्याला मान्य नाही काय ? ' श्रीमहाराजांनी उत्तर दिले, ' माझ्यासारख्याची गोष्ट सोडून द्या, पण जे संत असतात तेच खरे सुसंस्कृत आणि सुधारलेले लोक समजावेत. जी कृती  सर्व बाजूंनी हिताची असते तीच संस्कृती होय; आणि 'सु' म्हणजे शिव, चांगले, त्याची धारणा करणारी सुधारणा होय. भगवंताकडे नेणारी कृती  हीच एकटी सर्व बाजूने हिताची असते कारण, हित म्हणजे कल्याण, आणि भगवंत तर कल्याणाचे निधान आहे. म्हणून ज्या कृतीच्या आरंभी, मध्ये आणि शेवटी भगवंत भरलेला आहे ती कृती संस्कृती होय. आपल्या कृतीमध्ये भगवंत कसा भरता येईल ? ते करणे सोपे आहे. प्रत्येक कृतीमध्ये कर्म करणारा, कर्म करण्याचे साधन, आणि प्रत्यक्ष कर्म, अशा तीन गोष्टी असतात, यापैकी कर्म आणि त्याचे साधन हे जडच असते. पण कर्म करणारा मात्र सचेतन जीव असतो. अर्थात कर्मामध्ये  भगवंत भरायला कर्म करणारा जीव भगवंताने भरून गेला पाहिजे. जिवामध्ये भगवंत भरायला जीवाने आपली दारे उघडी टाकली पाहिजेत. या सगळ्याचा अर्थ असा कि जो जीव मीपणाने मरून भगवंताच्या स्मरणात विरून  गेला तोच भगवंताने भरून राहिला. अशा लोकांना संत म्हणतात; आणि ते जी जी कर्मे करतात ती ती भगवंताच्या प्रेरणेनेच आणि भगवंतासाठीच असल्यामुळे त्या कर्माच्यापासून जगाचे कल्याण घडते. संतांच्या  प्रत्येक कर्मामध्ये तुम्हाला प्रेम, दया, परोपकार, नि:स्वार्थीपणा, आणि भगवंताची निष्ठा याच गोष्टी आढळून येतील.' 
          त्याचप्रमाणे सुधारणा म्हणजे जे शिव आहे किंवा जे मंगल आहे त्याची धारणा होय. जे खरे मंगल आहे त्यामध्ये अमंगलाचे नावदेखील असता कामा नये. या जगातली अशी एक तरी वस्तू मला दाखवा की जी सर्वस्वी मंगल आहे ! या दृश्य जगातली कोणतीही वस्तू अशी पूर्ण मंगल असणे शक्यच नाही. कारण, जग हे त्रिगुणात्मक असल्यामुळे जेथे चांगले तेथे वाईट असते, जेथे उजेड तेथे अंधार असतो, जेथे मंगल असते तेथे अमंगल असते. जर दृश्य वस्तूमध्ये मंगल नाही तर ते सुक्ष्मातच असले पाहिजे. रूप हे दृश्य आहे आणि नाम हे सूक्ष्म आहे म्हणून भगवंताच्या नामाइतके पूर्ण मंगल असे दुसरे कोणतेही नाही. अर्थात ज्याने भगवंताचे नाम आपल्या अंतरात धारण केले  तोच खरा सुधारलेला मनुष्य होय. साहेबासारखे खाणे व पिणे, त्यांच्यासारखे कपडे घालणे, त्यांच्यासारखे व्यवहार करणे, हे सुधारणेचे लक्षण नसून, भगवंताच्या नामाची आवड उत्पन्न होऊन ते घ्यावेसे वाटणे हे खरे सुधारणेचे लक्षण आहे. ' 
          सुधारणा आणि संस्कृती  यासंदर्भात श्रीमहाराजांचे विचार ऐकून फडके थक्कच झाले तरी त्यांना एक शंका होती की, नवनव्या शोध, सुधारणांमुळे होणाऱ्या सोयी यामुळे मनुष्याची सुधारणा व्हायला काही उपयोग नाही का ? या प्रश्नावर श्रीमहाराज सांगतात, ' नवीन नवीन शोध लागत आहेत आणि त्यामुळे नवीन सोयी होत आहेत हे स्पष्टच दिसते आहे. पण यामुळे मनुष्य खरोखर सुखी झाला आहे काय ? अधिक सुखी बनणे हेच  सुधारणेचे फळ आहे. साहेबाच्या नव्या शोधांनी मनुष्याच्या देहाला सुख मिळेल, परंतु खरे सुख मनाच्या अवस्थेवर अवलंबून असल्याने असे शोध कितीही लागले तरी मनुष्य खरा सुखी होणार नाही. ' मध्येच फडके म्हणाले, ' अहो, याचा अर्थ असा की आपण देहाच्या सुखसोयींना महत्त्व देत नाही.' श्रीमहाराज लगेच बोलले,   ' महत्त्व का देत नाही ? देहाला आम्ही महत्त्व देतो, पण वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देत नाही. परमार्थाचे साधन देखील जर देहावर अवलंबून आहे तर देहाला महत्त्व न देऊन कसे चालेल ? परंतु देहाला सर्वस्व मानून आणि त्याला सुखात ठेवण्याच्या नदी लागून आत्म्याची कुचंबणा करणे हे आत्मघाताचे लक्षण आहे. तुम्ही सध्या जिला सुधारणा म्हणता तिचा प्रवाह या दिशेने जोराने वहात आहे. सर्व जग त्यात गुरफटले जात असून आणखी पाचपन्नास वर्षांनी या सुधारणेची कडू फळे खाण्याचा प्रसंग आल्याशिवाय राहणार नाही.' पुन्हा फडक्यांनी विचारले, ' महाराज, आपले विचार फारच खोल आणि व्यापक आहेत, पण या पुढे होणाऱ्या विनाशापासून वाचण्याचा काही मार्ग आहे का ? श्रीमहाराज म्हणाले,' का नाही ? मार्ग आहेच आहे ! प्रत्येकाने, निदान ज्याला प्रपंचाला पुरेसे मिळत आहे त्याने तरी, आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानून आपले लक्ष भगवंताकडे वळविले आणि आपला काल त्याच्या नामात घालविला तर जगातला द्वेष, मत्सर, लोभ आणि क्षोभ पुष्कळ कमी  होतील आणि सामान्य मनुष्य सुखी राहील. खरे ना ? ' 
          ' मी आजपासून नाम घेत जाईन ! ' असे म्हणून फडके निघून गेले.

|| जय जय रघुवीर समर्थ ||         

Saturday, May 14, 2011

श्रीमहाराज ' नामावतार ' - ११




|| श्रीराम समर्थ ||
   || श्रीसद्गुरु  ब्रह्मचैतन्य महाराज समर्थ ||

          संत महात्मे भगवंताचे भजन कसे करतात हे भगवंत सांगत आहेत.-
सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रता: |
              नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते ||गीता अ. ९-१४ || 
          ते दृढनिश्चयी भक्तजन निरंतर माझ्या गुणांचे व नामाचे कीर्तन करित आणि माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करित व मला वारंवार नमस्कार करित सदा माझ्या ध्यानात निमग्न होऊन अनन्यभक्तीने माझी उपासना करतात.
          श्रीमहाराजांनी भगवंताशी अनन्य होऊन ' मी भगवंताचा आहे आणि भगवंत माझे आहेत ' असा संबंध जोडून आयुष्यभर रामरायांच्या गुणांचे व नामाचे कीर्तन केले. शरीराने, वाणीने, मनाने, इंद्रियांनी, बुद्धीने त्यांनी जे जे केले ते रामरायाशी नित्ययुक्त होऊन केले, शरणागत भावाने केले.
भगवंताची उपासना - लोक मनापासून नाम घेऊ लागलेले  पाहून श्रीमहाराजांना समाधान झाले. भगवंताच्या उपासने संदर्भात ते उद्गारले, ' नुसता प्रपंच चांगला करणे हे काही मनुष्यजन्माचे ध्येय नव्हे. जनावरेदेखील आपापला प्रपंच करतात. मनुष्याने भगवंताची उपासना करून त्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे, तरच प्रपंचातल्या कष्टांचे सार्थक होते. सध्याच्या परिस्थितीमध्ये उपासना करायला नामासारखा उपाय नाही. म्हणून इतका खटाटोप मी करून दाखवतो. प्रत्येकाने नाम घ्यावे हि माझी इच्छा आहे. रामरायाने माझी इच्छा पूर्ण केली. '
          ' नि:स्वार्थीपणामध्ये मनुष्यजीवानाचे सार्थक आहे हे सर्वांस समजते; परंतु जोपर्यंत त्याला भगवंताचे अधिष्ठान नसते तोपर्यंत त्याच्यापासून मनुष्याला खरी निष्कामता व खरे समाधान मिळत नाही. आणि ही जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत कोणालाही शांती  व कृतकृत्यता प्राप्त होत नाहीत. प्रपंचाची घडी बिघडू न देता भगवंताची उपासना करणे असेल तर त्याचे नामच घेणे अवश्य आहे. '
साधनचतुष्टय - ' मला ब्रह्म दाखवा ' असा हट्टाग्रह करणाऱ्या एका साधकास उद्देशून केलेल्या एका निरुपणात श्रीमहाराज सांगतात, ' परमार्थ साधण्यासाठी अगोदर साधनांचा पाया घालावा लागतो. शास्त्रात चार प्रकारचे साधन सांगितले आहे. प्रथम नित्यानित्यवस्तूविवेक करावा. अनित्य जो विषय त्याच्या बाबतीत आपण उदास व्हावे. नित्य जो भगवंत त्याच्याकडे लक्ष द्यावे. नंतर या जगातली किंवा स्वर्गातली भोगवासना नाहीशी करावी. हे दुसरे साधन होय. आपले मन बाह्य विषयांकडे धाव घेते, तेथून त्याला खेचून आणावे आणि भगवंताकडे लावावे. आपण चूक केली नसतानासुद्धा कोणी जाच केला तरी शांतपणे सहन करावे, हे तिसरे साधन होय. शेवटी भगवंताच्या भेटीची किंवा सद्गुरूंच्या भेटीची खरी तळमळ लागावी. हि सर्व साधनसामुग्री असेल तरच साधकाला ब्रह्मदर्शन घडेल. ' 
भगवंताचे अनुसंधान - श्रीमहाराजांच्या सांगण्यावरून काही तरुणांनी खोदलेल्या विहीरीला श्रीमहाराजांनी,   'जानकीजीवन स्मरण जय जय राम ! पाणी लागेल, चल मार कुदळ ' असे म्हणताच कुदळ मारल्यावर पाण्याचा झोत वर आला ! सर्वांना आनंद झाला पण श्रीमहाराज बोलले, ' भगवंताच्या नामामध्ये फार मोठे सामर्थ्य आहे. त्याचे नाव घेऊन जो जगात वावरेल त्याला व्यवहारामध्ये नेहमीच यश येईल असे नाही; परंतु भगवंत त्याची लाज राखील यात शंका नाही. प्रपंचातले यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत. भगवंताच्या अनुसंधानाला खरे महत्त्व  आहे. '
रामाची इच्छा - श्रीमहाराज सांगतात, ' रामाच्या इच्छेनेच आपल्याला सुखदु;ख भोगावे लागते. पण ते आपल्याला सर्वांच्या शेवटी आठवते म्हणून सुखदु:ख भोगावे लागते.म्हणून आपण सुरवातीपासून रामाची इच्छा लक्षात ठेऊन वागू. यासाठी त्याच्या नामाची गरज आहे. '
प्रपंचाची तऱ्हा - एका प्रसंगी श्रीमहाराज म्हणाले, ' प्रपंचाची तऱ्हा हि अशी आहे. आज सुख झाले म्हणून जरा बरे वाटले की लगेच उद्या दु:खाचे ताट पुढे वाढून ठेवलेले असते. म्हणून एका डोळ्यात सुखाचे अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात दु:खाचे अश्रू ठेवून माणसाने प्रपंचात वागावे. प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेनेच जर घडते तर एकीचे सुख आणि दुसरीचे दु:ख का मानावे ? शहाण्या माणसाने आपले चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावे, आणि बरा वाईट प्रसंग येईल त्याला सामील होऊन जावे. '
रामरायाने अश्रू गाळले- गोंदवल्यास श्रीरामाने तीनदा अश्रू गाळले. सन १८९७ साली श्रीमहाराज एकाएकी नैमिष्यारण्यात जाण्यासाठी निघाले त्यावेळी रामरायाच्या डोळ्यातून अश्रुपात झाला. सन १९०९ साली श्रीमहाराजांना प्लेग झाला त्यावेळी दुसऱ्यांदा रामाच्या डोळ्यात पाणी आले; आणि सन १९१३ साली २० डिसेंबर रोजी, म्हणजे श्रीमहाराजांनी देह ठेवण्या अगोदर चार दिवस, श्रीमहाराज भजन करीत असता पुन्हा तिसऱ्यांदा रामरायाच्या डोळ्यात पाणी आले.
          सन १९०९ साली गोंदवल्याच्या आसपासच्या गावामध्ये प्लेगने धुमाकूळ मांडला होता. एके दिवशी संध्याकाळी श्रीमहाराजांना सपाटून ताप भरला. रात्रीतच त्यांच्या गळ्याच्या दोन्ही बाजूंना मोठमोठ्या गांठी येऊन गळा खूप सुजला. श्रीमहाराजांना प्लेगची लागण झाली होती. शरीर तापाने फणफणत होते. श्रीमहाराज असह्य झाल्याने कण्हत असत. एके दिवशी गणपतराव दामलेंच्या लक्षात आले की रामाच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. श्रीमहाराजांना हे सांगताच तशा तापातच त्यांनी सोवळ्याची लंगोटी नेसून मऊ रुमालाने रामाचे डोळे पुशीत ते रामाला म्हणाले, ' रामा ! मला ताप आला म्हणून तुला इतके का वाईट वाटते ? मला बरे वाटेल ! ' जवळजवळ पंचवीस मिनिटे रामाच्या डोळ्यातून पाणी येत होते. पाणी येण्याचे थांबल्यावर श्रीमहाराजांनी रामाचे कपडे बदलले. श्रीमहाराज खोलीत परत जाण्यास निघाले तेव्हा इतकेच बोलले, ' ही गोष्ट बाहेर कुणाला कळवू नका. उद्या रामाला दुधाचा अभिषेक करावा. ' 
          असली बातमी पसरल्यावाचून रहात नाही. त्याकाळात या घटनेची बातमी ' केसरी ' वृत्तपत्रात छापून आली होती. 
श्रीमहाराजांनी मनातले ओळखले - गोंदवल्यास स्वैंपाकघरामध्ये खऱ्या काम करणाऱ्या तीन बायका होत्या. पहिली मुक्ताबाई, दुसरी गंगुताई, आणि तिसरी काशीताई. इतरही स्त्री-पुरुष त्यांच्या मदतीला असत पण या तिघीजणी देहाकडे न पाहता चुलीपाशी खपत असत. एकेकजण आठ आठ पायली पिठाच्या भाकऱ्या भाजीत. मुक्ताबाई ही बालविधवा असून श्रीमहाराजांच्या दूरच्या नात्यातली होती. या तिघीजणींवर श्रीमहाराजांचे विशेष लक्ष असे.एकदा सकाळी मुक्ताबाई दत्तमंदिरात बसली असता सहज तिच्या मनात आले की आज आपण गव्हाची खीर खावी. सहज आलेला हा विचार ती विसरून देखील गेली. पण इकडे राममंदिरात श्रीमहाराज स्वैंपाकघरात गेले आणि म्हणाले, ' गंगुताई आज रामाला नैवेद्यासाठी गव्हाची खीर करा. ' रामाला नैवेद्य दाखविल्यावर श्रीमहाराजांनी गंगुताईकडून एक मोठे फुलपात्र भरून खीर घेतली, त्यावर झाकण घातले, आणि ती घेऊन स्वत: दत्तमंदिरात जाऊन मुक्ताबाईला ते म्हणाले, ' मुक्ताबाई, ही घे खीर ! पोटभर खा हं ? आणखी लागली तर निरोप पाठव. ' सहज मनात आलेली गोष्ट श्रीमहाराजांनी इतक्या प्रेमाने पुरविलेली पाहून मुकताबाईच्या डोळ्यांना पाणी आले. ती म्हणाली, ' महाराज, माझ्या बापानेदेखील असे माझे लाड पुरविले नाहीत; मी आपल्याला काय सांगू ? '
          एकदा गोंदवल्यास निरुपणाला बसले असता श्रीमहाराज म्हणाले, ' एखादी गोष्ट मला सांगावी असे जर तुम्हाला वाटले तर ती तुम्ही मारुतीला सांगा, म्हणजे ती मला आपोआप कळेल. '
श्रीमहाराजांना दम्याचा विकार - विषप्रयोग झाल्यापासून श्रीमहाराजांना जोराचा दमा सुरु झाला. एकदा दमा सुरु झाला म्हणजे सबंध रात्रभर त्यांना जागरण होई. इतकेच नव्हे तर पुष्कळ वेळा पलंगाच्या बाजूला उभे राहून तक्क्यावर डोके ठेवून सारी रात्र घालवावी लागे. दहाबारा तास उभे राहिल्यामुळे पाय भारावून त्यांच्यावर चांगली सूज येई. तरी त्यांचे सर्व व्यवहार यथासांग चालू असायचे. त्यांचा दमा सर्वस्वी त्यांच्या ताब्यात होता. श्रीमहाराज भजनाला उभे राहताच दमा कोठच्या कोठे पळून जाई. भजन संपताच थांबलेला दमा पूर्ववत सुरु होई. श्रीमहाराज म्हणत, ' तो आपल्या कामाच्या वेळी त्रास देत नाही ना ! मग आता येईना का बिचारा ! ' 
' जग हे असे आहे ! ' - एकदा संध्याकाळी नदीकडून परत येताना श्रीमहाराजांना दमा सुरु झाला. दम्याचा जोर इतका होता की पाहता पाहता त्यांनी डोळे फिरविले आणि ते पूर्ण बेशुद्ध झाले. हळू हळू शरीर थंड झाले, श्वास बंद होता आणि जिवंतपणाचे कोणतेच लक्षण आढळेना असे झाले. सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले. लोकांचा धीर सुटून बायाकापुरुष हळूहळू रडू लागण्यास आरंभ झाला. अलीकडेच अनुग्रह घेतलेल्या सांगलीच्या एका बाईंच्या  कानावर ही गोष्ट जाताच त्या धावत मंदिरात आल्या आणि मोठ्याने हंबरडा फोडून रडत रडत म्हणाल्या, 
' महाराज ! तुम्ही गेलात हे ठीक आहे पण मी ठेवायला दिलेल्या माझ्या दागिन्यांच्या डब्याचे काय ? ' ती बाई असे म्हणाली मात्र, श्रीमहाराजांनी मान  सरळ करून डोळे उघडले, ते मिस्कीलपणे थोडे हसले आणि तिला म्हणाले, ' बाई ! मी मेलो नाही, मी जिवंत आहे.तुमचा दागिन्यांचा डबा तुम्हाला परत देईन आणि मगच जाईन.मग मला जायला हरकत नाही ना ? ' या प्रसंगाने दागिन्यांचा डबा मागणारी बाई वरमली.
          काहीवेळापूर्वी सर्व मंदिरात असलेले उदासीन व शोकाकुल वातावरण पालटले. श्रीमहाराजांचे बोलणे ऐकून सर्व मंडळी पोटभर हसली.उपस्थित सर्वांना उद्देशून श्रीमहाराज बोलले, ' जग हे असे आहे ! ज्या साधूच्या प्रारब्धात काही नसेल त्याचाच प्रपंची लोकांशी संबंध येतो. प्रपंची माणसे अत्यंत स्वार्थी असतात, त्यांचा स्वार्थ यत्किंचित न बिघडता त्यांना परमार्थ पाहिजे असतो. हे कसे शक्य आहे ? अत्यंत नि:स्वार्थी बनणे याचे नाव परमार्थ आहे. तो साधायला थोडा तरी स्वार्थ सोडायला तयार व्हावे. साधूसंतांच्याकडे जाऊन हेच शिकायचे असते. प्रपंचावर सर्वस्वी पाणी सोडा असे कोणीच सांगत नाही, आणि असे सांगितले तरी कोणी ऐकत नाही; पण निदान प्रपंच म्हणजे आपला स्वार्थीपणा, हेच आपले सर्वस्व मानू नका असे संत सांगतात ते काही गैर नाही. स्वार्थ कमी होण्यासाठी वासना कमी झाली पाहिजे; वासना कमी होण्यासाठी भगवंताची कांस धरली पाहिजे; भगवंताची कांस धरण्यासाठी त्याचे अनुसंधान ठेवले पाहिजे; आणि त्याचे अनुसंधान टिकविण्यासाठी त्याचे नाम घेतले पाहिजे. म्हणून तुम्ही सर्वांनी नाम घेत जावे. ज्याला नामाचे प्रेम लागले त्याला भगवंताचे दर्शन घडेल ! ' 
लोकसंग्रह - सरकारने श्रीमहाराजांना पंचक्रोशीपुरते धर्माचार्यांचे अधिकार दिले होते. भाऊसाहेब केतकर, बापूसाहेब साठ्ये, बापूसाहेब खरे, अप्पासाहेब भडगांवकर, वगैरे मंडळींना श्रीमहाराज ' माझे कौन्सिल ' असे म्हणत आजूबाजूच्या गावातले पुष्कळ तंटे त्यांच्याकडे येत, आणि ते एखाद्या न्यायाधीशाप्रमाणे मध्ये बसून दोन्ही बाजू ऐकून घेत. तंटा करणाऱ्यांपैकी खरा कोण व खोटा कोण हे अंतर्ज्ञानामुळे श्रीमहाराजांना तत्काळ कळत असे. म्हणून ते अशा खुबीने तंटा तोडीत की, त्यामुळे दोन्ही बाजू समाधान पावून घरी जात. जाताना प्रत्येकाला जेवण मिळे ! 
          आपल्याकडे येणाऱ्या कोणत्याही माणसाचा अव्हेर करावयाचा नाही हे श्रीमहाराजांच्या लोकसंग्रहाचे प्रधान तत्त्व होते. त्यामुळे काही निमित्ताने त्यांचा निंदक जरी त्यांच्याकडे आला तरी ते त्याच्याशी फार प्रेमाने वागत. तीच रीत व्यसनी माणसाशी वागताना पाळत असत. याचा परिणाम असा होई की तो मनुष्य आपोआप त्यांना वश होऊन जाई, आणि एकदा वश झाला की त्याला भगवंताच्या मार्गावर नेऊन सोडण्याची त्यांची करामत त्याला अनुभवायला सापडे.
          आपल्या प्रपंचात असणारी उणीव भरून काढणे हेच श्रीमहाराजांचे काम आहे या भावनेने गोंदवल्यास येणाऱ्या मंडळींची निराशा होई. त्यांच्यापासून अपमान, अपवाद, अपकीर्ती आणि अपघातदेखील श्रीमहाराजांना सोसावे लागले, पण हे सर्व त्यांनी मोठ्या सहजवृत्तीने सोसलं. 
          गोंदवल्यास त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसावर श्रीमहाराज पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम करीत. एका वर्षी दिवाळीला पुष्कळ मंडळी गोंदवल्यास जमली. कर्नाटकातून श्रीब्रह्मानंददेखील बरीच मंडळी घेऊन आले होते. दिवाळीच्या दिवशी सकाळी श्रीमहाराज स्वत: पहाटे उठले आणि त्यांनी लवकर पाणी तापविण्याची व्यवस्था करून सर्वांना आपल्या हाताने स्नान घातले. नंतर सर्व मंडळींनी त्यांना स्नान घातले. त्यांचे स्नान चालू असता मुक्ताबाईच्या मनात आले की, ' मलाही महाराजांना दोन तांबे घालायला मिळाले तर किती छान होईल ! ' इकडे त्यांचे स्नान बहुतेक संपले होते तरी ते म्हणाले, ' मुक्ताबाई ! मला थंडी वाजते आहे. दोन तांबे कढत पाणी आणून घाल ! ' तिने चटदिशी घंगाळ भरून आणले आणि त्यांना मनसोक्त पाणी घातले आणि तिचे अगदी समाधान झाले. 
राममंदिराची स्थापना - श्रीमहाराजांनी पुष्कळ ठिकाणी रामाची मंदिरे स्थापन केली. आपण सामान्यपणे समजतो त्यापेक्षा मंदिराविषयी त्यांची कल्पना निराळी होती. ज्याप्रमाणे विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केंद्र असते त्याचप्रमाणे मंदिर हे अलौकिक म्हणजे अध्यात्मविद्येचे केंद्र असले पाहिजे.आपल्या आचारधर्माचे आणि परंपरेचे रक्षण करणे हे मंदिराचे काम असून त्यात राहणारे लोकदेखील त्या पेशाला लायक असेच असावेत. मंदिरात अध्यात्माचे श्रवण व मनन चालावे. जो साधक असेल त्याला साधन करण्यास ते योग्य स्थान असावे.प्रपंचाच्या त्रासाने कष्टी झालेल्या जीवाला मंदिरात आल्यानंतर स्वत:च्या दु:खाचा काही काळ तरी विसर पडावा असे तेथील वातावरण असावे. मंदिरात नियमित अन्नदान व नियमित उपासना चालू असावी. सारांश, मंदिर हे मोठे पवित्र स्थान असले पाहिजे. मंदिरात गेले की भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव झाली पाहिजे ! 
' भजन मनापासून घडावे ' - भजन कसे असावे हे श्रीमहाराज सांगतात, ' माझे भक्त जेथे माझे भजन करतात तेथे मी हजर आहे हे भगवंताचे वचन पूर्ण खरे आहे. पण आपण भजन जे करतो ते भजनाचे सोंग होते, म्हणून भगवंत देखील आपल्याकडे तितपतच लक्ष देतो. भजन कसे मनापासून घडावे ! प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे आणि आपले म्हणणे ऐकतो आहे अशा खऱ्या भावनेने भजन म्हणावे. अशा प्रकारच्या भजनाने उपासनेला जोर चढतो. खऱ्या भजनाला तालसूर लागत नाहीत; त्याला प्रेमळपणा लागतो,तसे नसते तर तुकारामबुवा आधी गाणे शिकले असते ! '
बिदरहळळी रामस्थापना व जपाची सांगता - श्री ब्रह्मानंदांनी  कर्नाटकात बिदरहळळी  या गावी रामाची स्थापना करण्यासाठी श्रीमहाराजांना आमंत्रण केले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे श्रीमहाराज लगेच जाऊ शकले नाहीत. शेवटी श्रीमहाराज एकदाचे निघाले.त्यांची प्रकृती  त्या वेळीही फारशी बरी नव्हती. बापूसाहेब साठ्ये यांना लिहिलेले त्यावेळचे एक पत्र उपलब्ध आहे, त्यावरून ते किती थकले होते याची कल्पना येईल. त्यातील मजकूर असा - ' विशेष लिहिण्याचे कारण की मी ब्रह्मानंदबुवांच्या इकडे प्राणाच्या कराराबरोबर आलो आहे. जीविताची आशा सोडून मी आलो आहे. दररोज ताप चार डिग्री येतो. श्वास फार झाला आहे. अन्न खाववत नाही. जिना चढून जाण्याची शक्ती  उरली नाही. असे झाले आहे. परंतु भागवतांनी ( डॉ. कुर्तकोटी यांना श्रीमहाराज ' भागवत ' किंवा ' महाभागवत 'संबोधित ) व ब्रह्मानंदबुवांनी तेरा कोटी जप केला आहे. याशिवाय दोन ठिकाणी श्रीरामाच्या मूर्तींची स्थापना होणार आहेत. एवढ्याचकरिता देह गेला तरी हरकत नाही असे समजून मी आलो आहे. माझ्याबरोबर सुमारे तिनशे मंडळी आहेत...... ' 
     बिदरहळळी  येथील रामाची स्थापना व जपाची सांगता हा समारंभ श्रीमहाराजांच्या उपस्थितीत संपन्न झाला तीन महिने अन्नदान चालू होते. श्रीमहाराजांच्या पूर्वायुष्यामध्ये त्यांनी कलकत्ता येथे केलेल्या 'हरिहाटा'ची आठवण होण्यासारखे भजन व अन्नदान बिदरहळळीला  झाले. त्यानंतर इतका मोठा समारंभ त्या भागामध्ये झाला नाही.
सोलापूरची रामस्थापना - बिदरहळळीहून  श्रीमहाराज कुर्तकोटीला  गेले. चार दिवस राहिल्यावर ते विजापूरवरून सोलापूरला आले. सोलापूरला भाऊसाहेब जवळगीकर यांनी बांधलेल्या मंदिरामध्ये रामाची स्थापना झाली. सोलापूरहून श्रीमहाराज कुर्डुवाडीला गेले. तेथे  दोन दिवस मुक्काम झाल्यावर ते एकाएकी पंढरपूरला आले. पंढरपुरात बडवे आपापसात तंटा करू लागले होते त्यामुळे पांडुरंगाची महापूजा बंद पडण्याची वेळ आली होती. देवस्थानची आबाळ होत होती. कलेक्टरने श्रीमहाराजांना पत्र धाडून तंटा मिटविण्याची विनंती केली होती. श्रीमहाराजांनी तंटा करणाऱ्या बडव्यांना बोलावून आणले आणि तंटा होण्याचे मूळ कारण शोधून काढले आणि सामोपचाराने तंटा मोडला व तसे कलेक्टरला कळविले. पुढे काही दिवस ते पंढरपूरला राहिले. 
          पंढरपुराहून सरळ गोंदवल्यास न जाता श्रीमहाराज पुण्यास गेले. तेथे सर्व मंडळींची भेट घेऊन प्रत्येकास नामाचा आधार  न सोडण्याविषयी बजावून सांगितले. दोन दिवस पुण्यास मुक्काम करून ते गोंदवल्यास निघाले. 

|| जय जय रघुवीर समर्थ ||